भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदासह नीरजने या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरजने या स्पर्धेत ८८.६७ मीटर लांब भाला फेकून स्पर्धा जिंकली. नीरजने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. पीटर्सने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.
दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक केली. या स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक रिपल्बिकचा भालाफेकपटू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने तिसरे स्थान पटकावले. गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सने नीरज चोप्राचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.
Neeraj Chopra wins 🥇 at the Wanda Diamond League in Doha on Friday with a throw of 88.67m 🇮🇳
#IndianAthletics pic.twitter.com/6PP5thpcNR— Athletics Federation of India (@afiindia) May 5, 2023
दोहा डायमंड लीगमधील कामगिरी
१) नीरज चोप्रा (भारत) – ८८.६७ मी
२) जाकुब वडलेच (चेक प्रजासत्ताक) – ८८.६३ मी
३) अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – ८५.८८ मी
४) ज्युलियन वेबर (जर्मनी) – ८२.६२ मी
५) अँड्रियन मार्डेरे (मोल्दोव्हा) – ८१.६७ मी
६) केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो) – ८१.२७ मी.
७) रॉडरिक जी. डीन (जपान) -७९.४४ मी
८) कर्टिस थॉम्पसन (यूएसए) – ७४.१३ मी