(रत्नागिरी)
जिल्ह्यातील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग न्यायालयांमधील खटले चालवण्यासाठी बारा विशेष सहाय्यक सरकारी वकीलांची निवड जाहीर झाली आहे. त्याचबरोबर प्रतिक्षा सूचितील पाच वकीलांची यादी निश्चित झाली आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसात निवड झालेल्या वकीलांना नियुक्ती पत्र मिळणार आहेत. सुमारे चार ते पाच वर्षे विशेष सहाय्यक सरकारी वकीलांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या.
जिल्हाधिकारी एन.देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता निवड समितीने मुलाखतीद्वारे बारा वकीलांची निवडसूची आणि पाच वकीलांची प्रतिक्षासूची निश्चित केली आहे. यामध्ये अॅड.निलांजन नाचणकर, अमृता गुरूपादगोळ, संजोग सावंत, चिन्मय दिक्षित, अक्षया सोमण, मोहसिना दावत, सुरेखा पाटील, प्रतिभा पवार, प्रसाद पाटील, सतिश नाईक, मयुर कानसे, शुभांगी सावके या वकीलांची निवड झाली आहे. अॅड.श्रेया शिवलकर, श्वेता मोरे, विनया अवसरे, शितल सोनवणे, उज्वला कुर्टे यांची नावे प्रतिक्षा सूचित आहेत.
जिल्हाधिकारी एन.देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, संचालक अभियोग संचनालय महाराष्ट्र राज्य कोकण परिक्षेत्रचे उपसंचालक रा.सा.चरके, सरकारी अभियोक्ता सहाय्यक संचालक अॅड.नितीन कानिटकर यांच्या समितीने मुलाखती घेवून निवडी केल्या आहेत. निवड झालेल्या बारा विशेष सहाय्यक सरकारी वकीलांमधील पाच जणांना रत्नागिरीतील न्यायालयांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. उर्वरित सहा वकीलांना लांजा, देवरूख, गुहागर, चिपळूणातील न्यायालयांमध्ये सरकारी पक्षाचे काम पहावे लागणार आहे.