(मुंबई)
एखाद्या विवाहित पुरुषाने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर तो बलात्कारच असेल, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या पत्नीसोबत संबंध ठेवणाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
एका महिलेने तक्रार या प्रकरणी तक्रार केली होती की, पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेताच आरोपीने १८ जून २०१४ रोजी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. आरोपीने आपला घटस्फोट झाल्याचे भासवत आपल्याशी लग्न केले आणि नंतर शारिरीक संबंध ठेवले.
पत्नीच्या तक्रारीची दखल घेत आरोपीविरोधात बलात्कार आणि बहुपत्नीत्वाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आपल्यावरील बलात्काराचा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी आरोपीने न्यायालयात केली होती. मात्र आरोपीला दिलासा देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या महिलेशी लग्न करणे व नंतर शारिरीक संबंध ठेवणे, हा बलात्कारच असेल, असा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे आरोपीविरोधात दाखल करण्यात आलेला बलात्कार आणि बहुपत्नीत्वाचा गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.