(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावचे धडाडीचे सरपंच स्वप्निल संजय देसाई यांनी गावातील सरपंचपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज पर्यंत कोट्यवधींची विकास कामे मार्गी लावली आहेत. गावचे उपक्रमशील सरपंच स्वप्निल देसाई यांनी गावातील विकास कामे मार्गी लावण्याच्या मुख्य हेतूनेच सरपंच पदासाठी ते अग्रस्थानी राहिले.सहा महिन्याच्या कालावधीत त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मूलभूत विकासकामांवर लक्ष वेधले. विशेष म्हणजे गावातील मूलभूत विकास कामांसाठी पाठपुरावा केला आणि गावातील विकासकामांना गती दिली.
या विकासकामांमध्ये प्रामुख्याने गावातील स्मशानभूमी स्वच्छता व सुशोभीकरण ,प्रसाधनगृहाची उत्तम सोय, देसाईवाडीतील स्मशानभूमीतील कामाची पूर्तता, देसाईवाडीतील तीन घरांना रस्ता व दरडप्रवण भागात दुर्घटने आधीच संरक्षण भिंतीदेखील पूर्णत्वास नेल्या.गावातील दहा घरांसाठी व मुख्य मंदिरापर्यंत जाणारी पायवाट वाचवण्यासाठी पाच ठिकाणी संरक्षण भिंती प्रस्तावित केल्या असल्याचे सरपंच स्वप्निल दिसाई यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कंपाउंड वॉलचे नूतनीकरण करण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत . तसेच प्राथमिक शाळेची पुनर्बाधणी व स्वच्छता गृह उपलब्ध करून दिले .गावातील उच्चशिक्षित मुलांना नेट चा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे बीएसएनएल तर्फे अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे.
गावातील पायाभूत सुविधांबरोबरच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेत तिथे रस्ता व पाखाडी देण्यावर त्यांचा भर आहे. गावात शोष खड्ड्यांची निर्मिती, गोबर गॅस उभारणी यावर आपला कटाक्ष असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायतची अद्यावत इमारत मंजूर करून तिचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले .विल्ये गावमंदिर स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले असून परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे .गावात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी व्यापक नळ पाणी योजना प्रस्तावित केली आहे. नदीतील गाळ काढून नदी चांगल्या प्रकारे प्रवाहित होण्यासाठी लोकवर्गणीतून व शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण गावात स्ट्रीट लाईट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते कार्यप्रवण झाले आहेत. येत्या साडेचार वर्षात गावातील दुर्लंक्षित विकास कामे शंभर टक्के पूर्णत्वास नेणे हेच आपले उचित ध्येय असल्याचे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.
टोकियो वाडी जमिनीच्या वादातून अडकलेला रस्ता पूर्णत्वास नेला आहे. एकूणच गावातील अशा विविध मूलभूत विकास कामे करत असताना सरपंच स्वप्निल देसाई यांना उद्योगमंत्री उदय सामंत तसेच उद्योजक भैय्या सामंत तसेच शासकीय अधिकारी यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. राई मुख्य रस्ता ते विल्ये धामणेवाडी रस्ता पूर्ण झाला आहे .धनगर वाडी ते विल्ये देसाईवाडी मंदिर रस्ताही पूर्णत्वास नेला आहे. विल्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत.उर्वरित कामे सुरू आहेत तर काही प्रस्तावित आहेत.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धडाडीचे सरपंच स्वप्निल देसाई यांनी गावात विकासाचा झंजावात सुरू ठेवला आहे.या कामात सरपंच यांना उपसरपंच अभिषेक कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमेय देसाई, विजय विलकर, सौ.सुकेशनी कांबळे, सौ.अहिल्या धामणे, सौ.आसावरी कांबळे, सौ.सुहानी कांबळे तसेच ग्रामसेवक व इतर सर्व कर्मचारी यांची टीम अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे.
सहा महिन्याच्या कालखंडात गावातील विकास कामे प्रगतीपथावर नेणारे सरपंच स्वप्निल देसाई यांचा विल्ये परिसर युवक मंडळाने १५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेला जाहीर सत्कार स्वप्निल देसाई यांनी नम्रपणे नाकारून आपण विकास कामावरती प्राधान्य देऊ असे ते म्हणाले. याकामी सर्व ग्रामस्थांचे तसेच युवा वर्गाचे आपणाला उत्तम सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.