(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावचे सुपुत्र, प्रतिष्ठित-प्रसिद्ध व्यवसायिक,विल्ये गावचे पहिले माजी सरपंच,तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष, शैक्षणिक- सामाजिक-राजकीय- सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावकारी व्यक्तिमत्त्व आझाद दत्ताराम देसाई यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी बुधवार दि. २६ रोजी पहाटे अल्पशा आजाराने विल्ये येथे दुःखद निधन झाले.
आझाद देसाई यांनी त्यावेळी जुनी अकरावी पर्यंत शिक्षण घेतले होते. अनेक क्षेत्रांचा त्यांचा चांगला अभ्यास होता.कणखर, धाडसी आणि अभ्यासू वृत्तीमुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा प्रभावीपणे ठसा उमटवला होता. प्रारंभीच्या काळात ते काही वर्ष मुंबईत होते.
आझादभाऊ देसाई यांनी गावातील शेती-उद्योग सांभाळून सामाजिक कार्यातही आवडीने नि जिद्दीने स्वतःला झोकून दिले.अनेक वर्षे ते शिवसेना विभाग प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत केली.दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध होते. युवा नेते अमर देसाई यांचे ते वडील होत. आझादभाऊ देसाई यांनी गावातील पहिले बहुमानाचे सरपंच पद भूषविले. तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपद समर्थपणे पेलून गावात सामाजिक सलोखा राखण्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले.
श्री शिवचैतन्य लोकसेवा प्रतिष्ठान संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष तसेच सोमेश्वर परिसर १६ गाव नवरात्र उत्सव मंडळाचेही ते संस्थापक अध्यक्ष होते. शिवाय ते पंचक्रोशी महामंडळ जाकादेवी परिसर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी पार पडली.
जाकादेवी बाजारपेठेतील प्रसिद्ध रुचिरा हॉटेलचे ते मालक होते.जाकादेवी सामंत इंग्लिश मिडियम शिक्षण संस्थेवर ते संचालक म्हणून कार्यरत होते.मंत्री उदय सामंत यांचे ते खंदे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात. आझादभाऊ देसाई यांच्या दुःखद निधनाबद्दल विल्ये-जाकादेवी दशक्रोशीतून शोक व्यक्त होत आहे.कै. आझादभाऊ देसाई यांच्या अंत्ययात्रेत रत्नागिरी तालुका, जिल्ह्यातील समाज बांधव, सर्व स्तरातील नागरिक तसेच जाकादेवी बाजारपेठेतील व्यवसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कै.आझादभाऊ देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी,नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.