(मुंबई)
सध्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाला चांगलाच जोर चढला आहे. सर्वच पक्षातील नेते हेच आपले काम व जबाबदारी असल्याचे मानत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्षनेते अंबादास दानवे माझ्या संपर्कात असून कधीही काही होऊ शकतं असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. ठाकरे गटात आलेल्या सुषमा अंधारेंविषयी दानवे यांनी आपल्याला फोन करून नाराजी व्यक्ती केली असल्याचा दावाही शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना पेव फुटले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी, आमदार सहभागी होत आहेत. आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे, मात्र आतापर्यंत कोणत्याही नेत्याचे नाव उघडपणे सांगण्यात येत नव्हते. पहिल्यांदाच संजय शिरसाट यांचे उघडपणे नाव घेऊन, ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “अंबादास दानवे यांचा मला फोन आला होता. ते आमच्या संपर्कात आहेत, कधीही काही होऊ शकतं.” तसेच त्यांची ही नाराजी सुषमा अंधारेंमुळे असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.