शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर वेळेवर मदत मिळाली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरूनच मराठा क्रांती ठोक मोर्चाने या घटनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मराठा समन्वय समितीची मुंबईत बैठक होती. त्या बैठकीसाठी ते बीडहून येत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. झोपेत असलेल्या मेटे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा अपघात झाल्यानतंर जवळपास तासभर कोणतीही मदत मिळाली नाही, असा दावा मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनी हा दावा फेटाळून लावताना, अपघाताची माहिती मिळताच पुढील काही मिनिटांतच आम्ही घटनास्थळी दाखल झालो होतो, असे म्हटले आहे. त्यातच रुग्णवाहिका विलंबाने पोहोचणे तसेच आजुबाजूच्या कुणीही मदत न करणे या घटनांवरूनदेखील हा अपघात की घातपात, असा संशय व्यक्त केला जात आहे.
आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघातानंतर जवळपास दोन तास रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती. आजुबाजूला मदतीसाठीदेखील कुणी थांबले नाही. हा अपघात होता की घातपात होता? याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासाठी अजून सरकार किती बळी घेणार आहे? असा सवालही त्यांनी केला. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.