(गांधीनगर)
बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छला गुरूवार दि. १५ जून रोजी सायंकाळी धडकले असून चक्रीवादळ धडकण्यापूर्वीपासूनच परिसरात विध्वंसाला सुरूवात झाली होती. चक्रीवादळामुळे ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहत आहेत. वा-याचा वेग ताशी १५० किमी पर्यंत पोहोचेल. जोरदार वा-यामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात झाडे आणि खांब पडायला सुरुवात झाली होती.
१५ जहाजे, ७ विमाने, एनडीआरएफच्या ३३ टीम सज्ज
कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र-उत्तर पश्चिमचे महानिरीक्षक एके हरबोला म्हणाले की आम्ही गुजरातमध्ये १५ जहाजे आणि ७ विमाने तयार ठेवली आहेत. एनडीआरएफच्या ३३ तुकड्याही तैनात आहेत.
१० राज्यांत परिणाम
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरात व्यतिरिक्त या वादळाचा प्रभाव इतर १० राज्यांमध्ये दिसत आहे. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय यांचा समावेश आहे. येथील अनेक भागात जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.
वादळाने बदलला अनेक वेळा मार्ग
गुजरातच्या हवामान खात्याने सांगितले की, दक्षिण अरबी समुद्रात वादळाची उत्पत्ती झाल्यानंतर, गुजरात किनारपट्टीजवळ येईपर्यंत त्याचा मार्ग अनेक वेळा बदलला. यामुळे ते कमकुवत झाले आहे, परंतु काही वेळा ते धोकादायक बनले.
वीज पुरवठ्यासाठी ६०० टीम
तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे. चक्रीवादळ संपल्यानंतर या भागातील वाहतूक आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सुमारे ६०० टीम तयार करण्यात आल्या आहेत.
९४ हजार लोक सुरक्षित स्थळी
गुजरातच्या आठ किनारी जिल्ह्यांतील ९४,००० लोकांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये नेण्यात आले आहे. एकट्या कच्छ जिल्ह्यातून ३४ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यानंतर जामनगरमध्ये १०,०००, मोरबीमध्ये ९,२४३, राजकोटमध्ये ६,०८९, देवभूमी द्वारकामध्ये ५,०३५, जुनागढमध्ये ४,६०४, पोरबंदरमध्ये ३,४६९ आणि गिर सोमनाथ जिल्ह्यात १,६०५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
कलम १४४ लागू
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने ६७ गाड्या रद्द केल्या आहेत, तर २५ गाड्या चक्रीवादळ प्रवण भागात वळवल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या संदर्भात पाकिस्तानमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सिंधच्या केटी बंदरला धडकले आहे.