(मुंबई)
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्याच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ अधिक असल्याने मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू होता. मात्र राज्याच्या राजकारणात शिंदे गटानेही नवनवीन चाली करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदें ठाकरे गटाविरोधात आणखी एक डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आजच्या दुस-या दिवशी आता मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाकरे गटाकडून कोंडी होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गेम खेळला आहे.
विधानसभेनंतर आता विधान परिषदेत त्यांनी प्रतोद बदलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी उपसभापती डॉ. निलम गो-हे यांना पत्र दिले आहे. विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याचे पत्र त्यांनी दिले. शिंदे गटाचा प्रतोद नेमल्यास खुद्द उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचा आदेश मानावा लागणार आहे.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाला शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटताना दिसत आहेत. विधानसभेत ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि शिंदे गटाकडून भरत गोगावले हे प्रतोद आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अधिक स्पष्टता येणार असतानाच आता विधान परिषदेतही शिंदे गटाने प्रतोदाची निवड केल्याने आणखीच राजकीय पेच निर्माण झाला आहे. सध्या विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब हे प्रतोद आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या पत्रानंतर ठाकरे गटाची मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड झाल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. आता शिंदे गटाने प्रतोदपदाचा नवा डाव खेळल्याने ठाकरे गट बॅकफूटला जाण्याची शक्यता आहे.