(मुंबई)
एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ रोजी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दोन्हीही शिंदें यांच्या गटाला दिले आहे.
बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत पडलेली ही सर्वात मोठी फूट आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे यांच्यातील शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टातही गेला आहे. तो निवडणूक आयोगाच्याही दारात होता. तिथे पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. तर सुप्रीम कोर्टातली सुनावणी नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. त्यावरचा निकाल येणं अपेक्षित आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २०१४ मध्ये पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र निवडणूक लढणार आहेत. तर आता २०२४ चा जागा वाटपाचा भाजपा आणि शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. पुढच्या निवडणुकीत शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. हा फॉर्म्युला शिंदे गट शिवसेनेला मान्य होण्यासारखा नाही, आता यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटणार का ? हे लवकरच समजणार आहे. बावनकुळे यांच्या विधानावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही.