(संगमेश्वर / प्रतिनिधी)
‘मी फटाके वाजविणार नाही., मी पैसे जाळणार नाही.!’ फटाके न वाजविता म्हणजे पैसे न जाळता वाचविलेल्या पैश्यातून विविध मार्गानी दिवाळी साजरी करूया, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना केले आहे. याबाबतची जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शाळांमधील विद्यार्थ्यांना मी पैसे जाळणार नाही मी फटाके वाजविणार नाही अशी शपथ दिली आहे.
या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण, हवा प्रदुषण, आग लागणे, अपघात होणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होणे, आजारी पडणे असे प्रकार घडतात असे आर्ते यांनी स्पष्ट केले आहे. प्रदुषणमुक्त, अपघातमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी श्री. आर्ते यांनी पुढाकार घेतला आहे. फटाके न वाजवता वाचविलेल्या पैश्यातून खाणे पिणे, पर्यटनातुन आनंद, गरजुंना मदत, विविध सामाजिक कामे करता येतील असा संदेश आर्ते यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. याकरिता सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी संगमेश्वर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पत्रके वाटून व त्यांना शपथ देखील दिली आहे. त्यांनी घेतलेल्या या उपक्रमाला तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे काही अंशी का होईना ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे, त्यांच्या या उपक्रमाबद्दल सुज्ञ जनतेमधून स्वागत होत आहे.