(वैभव पवार/गणपतीपुळे)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, ते आयुष्यात दिशादर्शकाचे काम करणारे आहेत. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे कृती केल्यास एक दिवस नक्कीच त्यांना यशाचा मार्ग दिसेल असा विश्वास शाळा जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष एकनाथ सखाराम तथा अप्पा धनावडे यांनी व्यक्त केला. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सलग १२ तास वाचन उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला दिलेल्या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालत असून या घटनेमध्ये बदल करण्याचे कोणतेही अधिकार कोणालाही नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला दिशादर्शक देणारे विचार आपल्या कार्यातुन समाजात पेरले. तेच विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे काळाची गरज असून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी याशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनाही वाचनाची आवड वाढावी व मानसिकता निर्माण व्हावी यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, शाळा जीर्णोद्धार समिती, माता – पालक संघ, शिक्षक – पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सलग १२ तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे अंतर्गत अनेक विषयाची व विविध स्वरूपाची पुस्तके वाचून हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. या उपक्रमामध्ये परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी समारोपप्रसंगी उपस्थित असणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून आपणही खूप मोठे होऊ शकतो हा विचार सकारात्मक दृष्टिकोनातून घेत अभ्यास करावा असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला तर विश्वनाथ शिर्के यांनी असे उपक्रम वारंवार व्हावेत कारण या माध्यमातून विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार, इतिहास, कार्य समजण्यास मदत होते. त्यामुळे अशा उपक्रमाची गरज असल्याचे स्पष्ट करत शाळेच्या वैविधतेचे कौतुक केले. तर या उपक्रमात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपल्या दिवसभरातील अनुभवाचे कथन करताना या उपक्रमाचे वैशिष्ट्ये सांगून हा उपक्रम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला वाचनातून घडवलं त्याच प्रकारे त्यांचाच विचार आत्मसात करण्यासाठी आम्ही वाचनाच्या माध्यमातून पुढे – पुढे जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीच्या वतीने आयोजित या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वैशाली कुर्टे, शाळा जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष एकनाथ धनावडे शाळा जिर्णोद्धार समितीचे उपाध्यक्ष रमेश तांबटकर, खजिनदार विश्वनाथ शिर्के यांच्यासह सर्वच पालक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. तर या वैविध्यपूर्ण उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि उपशिक्षक गोविंद डुमनर यांनी केले.