(जाकादेवी / वार्ताहर )
कोकणातील ग्रामीण भागाचा विचार करता शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी बेकारीचे प्रमाण कमी झालेले नाही. सुशिक्षित बेकारांची संख्या प्रचंड आहे.यावर उपाय म्हणून यापुढे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम अंमलात आणून स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या हाताला काम देण्यासाठी विविध प्रकारचे छोटे-मोठे व्यवसायाचे (उद्योग)प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी मालगुंड येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या पुढे बोलताना आपला कृती संकल्प व्यक्त केला.
यावेळी बंधू मयेकर म्हणाले की ,स्वावलंबन ही काळाची गरज आहे.नोकऱ्यांवर मर्यादा आल्या आहेत. सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली आहे. पदवीधर व पदव्युत्तर युवक -युवती आपल्या भागामध्येही मोठ्या संख्येने आहेत. शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याची इच्छा असूनही अपेक्षित काम करण्याचे कौशल्य अवगत केले नसल्याने सुशिक्षित बेकारांमध्ये भर पडत आहे. हाताला काम नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. त्यामुळे पालकही चिंतेत असतात. यासाठी आमच्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून दहावी बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच त्यांच्या आवडी प्रमाणे कौशल्य संपादन करण्यासाठी संधी दिली जाईल.
आज आपल्या विभागात साधे प्लंबर,वेल्डर, पर्यटन गाईड, विविध यंत्रांची दुरूस्ती करणारे कुशल कारागीर, प्रगत शेतकरी अपेक्षेप्रमाणे मिळत नाही,ही बाब चिंतेची आहे. विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम मालगुंड एज्युकेशन सोसायटीमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सुनिल मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, कोषाध्यक्ष संदीप कदम उपस्थित होते.
वार्षिक सभेत प्रारंभी संस्थेचे दिवंगत सभासद व हितचिंतक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेत इतिवृत्ताला व जमाखर्चाला मंजूरी देण्यात आली. शिक्षण संस्थेच्या शाळांमधून चाललेल्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल संस्थेचे सचिव व बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजचे सी.ई.ओ. विनायक राऊत, चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी माहिती देऊन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कामगिरीचे विशेष अभिनंदन केले. यावेळी नवोदित मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांना शुभेच्छा देण्यात आल्या.