( संगमेश्वर / प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांची कला त्यांच्या बालवयात जतन करणे खूप महत्वाचे असते . बालवयात मुलांच्या विचारांची झेप कल्पनाशक्ती पलीकडील असल्याने त्यांच्या अंतर्मनातून उमटणारा एखादा विषय हा भल्याभल्यांना अंतर्मुख करणारा असतो . बालकलेचे महत्व ओळखून संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा संग्रह करण्याचा उपक्रम हाती घेतला . प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते २३ व्या कलासाधना चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करण्यात आले.
कलासाधना चित्रकला वार्षिक मधील कलाकृती एवढ्या सुंदर आहेत की , त्या प्रशालेतील चिमुकल्या हातांनी रेखाटलेल्या असतील असे वाटतच नाही . प्रशालेकडे बाराशे कलाकृतींचा संग्रह होणे , ही शाळा आणि संस्थेला अभिमानाची बाब असल्याचे मत संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांनी या चित्रकला वार्षिक प्रकाशनानंतर बोलतांना व्यक्त केले . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी कलासाधना मधील चित्र आवर्जून पाहावी असे आवाहन सचिव धनंजय शेट्ये यांनी यावेळी केले . यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , समीर शेरे , बाबा नारकर , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची कला ही एखाद्या तज्ञ कलाकारालाही कधीकधी अंतर्मुख व्हायला लावते . बालकलाकारांच्या अंतर्मनातील भावविश्व ते कलेतील सर्व मर्यादा नियम ओलांडून अत्यंत निरागसपणे आपल्या कलाकृतीतून दृष्य रुपात आणत असतात . प्रसंगी बालकला समजणेही अवघड जाते . यासाठी बालकलाकारांना त्यांच्या कलाकृतीत काम करतांना नियमांच्या चौकटीत बांधून न ठेवता मोकळेपणाने काम करायला दिल्यास कागदावर त्यांच्या मनातील खरे आकार आणि रंग उमटतात . यातूनच आश्चर्यकारक चित्रे तयार होतात . पैसा फंडचा कलासाधना हा उपक्रम अशा कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून यामुळेच येथील असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात आपली उल्लेखनीय प्रगती करीत आहेत.
– विष्णू परीट , चित्रकार
फोटो
१) कलासाधना या बालकलाकारांच्या चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करतांना संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , संस्था सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे , सदस्य संदीप सुर्वे ,रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर दिसत आहेत .
२) प्रशालेत ध्वजारोहण करताना संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये आणि मान्यवर
३) प्रजासत्ताकदिनानिमित्त लेझीम नृत्य सादर करताना प्रशालेच्या विद्यार्थीनी