(नवी दिल्ली)
देशाची राजधानी दिल्लीत सध्या जी-२० शिखर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. परदेशी पाहुण्यांच्या खाण्या-पिण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये खास पक्वान्ने वाढण्यासाठीची ताटे, वाटीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या ताट-वाट्यांत जेवण वाढले जाणार आहे. यामध्ये त्यांना भारतीय संस्कृतीचे आणि वारशाचे दर्शन घडणार आहे.
जी-२० परिषदेसाठी जगभरातील अनेक देशांचे नेते भारतात आले आहेत. ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबरला नवी दिल्लीत या नेत्यांची शिखर परिषद पार पडणार आहे. जी-२० शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे. परदेशी पाहुण्यांच्या आगमनासाठी सजावट करण्यात आली असून रस्त्यांवर रोषणाईदेखील केली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांना दिल्लीतील लोकांना छतावरदेखील न जाण्याचे आदेश दिले आहेत. तर सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.
दरम्यान, भांडी तयार करणा-या कंपनीने सांगितले की, त्यांची कंपनी ११ हॉटेल्समध्ये भांडी पाठवत आहे. ज्यामध्ये आयटीसी ताज हॉटेलचाही समावेश आहे. या आधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले, तेव्हा अशाच भांड्यांची व्यवस्था केली होती. ही भांडी भारतीय संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडवतात. या भांड्यांमध्ये देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या आकारातले नक्षीकाम करण्यात आले आहे. जी २० साठी महाराजा थाळीच्या डिझाईनसोबतच दक्षिण भारतातीलही काही वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम करण्यात आले आहे. या भांड्यांच्या माध्यमातून भारताचा दुर्मिळ होत चाललेला वारसा दाखवण्यात येत आहे.
जी-२० परिषदेत जगभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहेत. त्यांच्याऐवजी त्यांच्या देशाचे प्रतिनिधी सामील होतील. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली की कोणत्या देशाचा नेता येत नाही, याने काही फरक पडत नाही. त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला देशांची बाजू मांडता आली पाहिजे.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून उचलून बंदिस्त ठिकाणी डांबण्यात आले होते. तसेच दिल्लीमधील झोपडपट्टी भाग जागतिक नेत्यांना दिसू नये, यासाठी हिरव्या रंगाची शेडनेट लावण्यात आली होती. अशातच आपल्या घरात थांबण्या-या स्थानिकांसाठी पोलिसांनी फरमान सुनावत ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी छतावर येऊ नये, असे म्हटले आहे.
दिल्लीत विदेशी अतिथींच्या सुरक्षेकरता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जी-20 शिखर परिषदेपूर्वी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव 12 सप्टेंबरपर्यंत पॅराग्लायडर, हँग-ग्लायडर आणि हॉट एअर बलून यासारख्या अपांरपारिक हवाई प्लॅटफॉर्म्सच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. दिल्लीत होणाऱ्या जी-20 परिषदेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. आयोजन स्थळांच्या सुरक्षेकरता आर्टिफिशियल इंटेलिजेन्स मॉड्यूलचा वापर केला जात आहे. सुरक्षेकरता दिल्लीत 50 हजार पोलीस जवानांना तैनात करण्यात आले आहे. तर जी-20 परिषदेच्या सुरक्षेत तैनात पोलिसांसाठी विशेष गणवेश तयार करण्यात आला आहे. याचबरोबर दिल्लीत दहशतवादविरोधी पथकही तैनात केले जाणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज दिल्लीत दाखल होत असून आजच त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार असून, या दोन नेत्यांमध्ये स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. जी-20 परिषदेसाठी सदस्य तसेच निमंत्रित देशांच्या प्रमुखांचे आगमन राजधानीत बुधवारपासून सुरू आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जुगनाथ गुरुवारी दिल्लीत दाखल झाले. भारतात येणार्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताची जबाबदारी विविध केंद्रीय मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. दिल्लीत आज पोहोचल्यानंतर बायडेन यांचा मुक्काम ‘आयटीसी मौर्य’ येथे असेल.
जी-२० मधील देश
जी-२० मध्ये भारतासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनाएटेड किंग्डम आणि अमेरिकेचा समावेश आहे. यासह यूरोपियन यूनियनदेखील जी-२० चा सदस्य आहे.