(मुंबई)
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासनतास रांगेत उभे राहतात. अशा भाविकांना विठूरायाचा लाडूचा प्रसाद मोफत द्यावा,अशी मागणी वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी विठ्ठल मंदिर समितीला केली आहे. या मागणीवर सकारात्मक विचार करणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
रामकृष्ण महाराज वीर यांनी सांगितले की, ठेकेदार संस्थेकडून मंदिर समिती 12 रुपये 50 पैशांना लाडू घेऊन भाविकांना 20 रुपयांना विकत आहे. यामुळे मंदिर समितीच्या तिजोरीत जवळपास वर्षभरात कोट्यवधी रुपये जमा होत आहेत. या आषाढीपूर्वी मंदिर समितीने दर्शनाच्या रांगेत उभे असलेल्या भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा. वारकरींच्या मागणीवर मंदिर समिती विचार करणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत लाडूचा प्रसाद देण्यास आमची काहीच अडचण नसल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी म्हटले आहे. मात्र ही सेवा कधी सुरू करणार यासंदर्भात त्यांनी मौन बाळगले आहे.
आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासनतास रांगेत उभे राहतात. या भाविकांच्या पैशातून देवाची तिजोरी भरतात. मग, या भाविकांना लाडूचा प्रसाद मोफत का दिला जात नाही? असा सवाल वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी विठ्ठल मंदिर समितीला केला आहे. यानंतर आम्ही यावर विचार करू अशी भूमिका मंदिर समितीचे सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. विठ्ठल मंदिरावर महसुलाचे कार्यालय झल्याचा सतत आरोप होत आहे आणि मंदिर समितीने भाविकांसाठी काय केले हे सांगावे?, असा सवालही वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी केला आहे.
यापूर्वी विठुरायाचा प्रसाद म्हणून चिरमुरे बत्तासे घेऊन भाविक परत जात होते. यानंतर मंदिर समितीने विठ्ठल प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू विक्रीला ठेवण्यास सुरुवात केली. यानंतर विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक आपल्या गावाकडे जाताना लाडूचा प्रसाद विकत घेऊन जातात. मंदिर समितीने २०१७ मध्ये लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अवघ्या दोन वर्षापूर्वी एका महिला बचत गटाला लाडू बनवण्याचा ठेका दिला. यातून मंदिर समितीला जवळपास १ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा या बचत गटाकडून करण्यात आला होता. यानंतर कोव्हिडमुळे ८ महिने लाडूचा प्रसाद थांबवण्यात आला होता.
दरम्यान, पुन्हा लाडूचा प्रसाद मंदिराने सुरू केल्यानंतर कोव्हिडपूर्वी ज्या संस्थेला ठेका दिला होता. त्यांना पुन्हा ठेका न देता जवळच्या संस्थेला लाडू बनविण्याचा ठेका दिल्याचा आरोप झाला होता. या नवीन संस्थेने खराब दर्जाचे लाडू दिल्याचा आरोपही ठेवला होता. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला होता. या संस्थेने बनविलेले लाडू वजनात देखील कमी भरत असल्याचे निदर्शनास आल्यावर या संस्थेचा ठेका मंदिर समितीने रद्द केला. आता पुन्हा मंदिर समितीकडून लाडू बनवण्याचा निर्णय कोणासाठी घेतला, असा सवाल वारकरी पाईक संघाने विचारला आहे.
लाडू बनविण्याचा ठेका खाजगी संस्थेला दिला तर होणाऱ्या फायद्यातून दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मोफत लाडू प्रसाद देण्याची विठ्ठल भक्तांची मागणी आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत लाडूचा प्रसाद देण्यास आमची काहीच अडचण नसल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी म्हटले असून ही सेवा कधी सुरू करणार यासंदर्भात त्यांनी मौन बाळगले आहे. या आषाढीपूर्वी मंदिर समितीने दर्शनाच्या रांगेत उभे असलेल्या भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा, अशी मागणी वारकरी पाईक संघाकडून होऊ लगाली आहे.