(चिपळूण /ओंकार रेळेकर)
दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे हैराण झाले असताना महावितरण विभागाकडून मिळणाऱ्या आर्थिक झटक्यांमुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. महावितरण विरोधी ग्राहकांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. सर्वसामान्यांच्या व्यथा, समस्या महावितरण अधीक्षक अभियंता लवेकर यांच्याशी निवेदनाच्या माध्यमातून निवेदीत करतांना सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारे काही अतिरिक्त कर रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यामध्ये १.३५वहन कर, १६%वीज शुल्क, इंधन समायोज कर ह्यासारखे कर रद्द करण्यात यावेत खरंतर मूळ बिलापेक्षा अधिक कर आकारून महावितरण सर्वसामान्य वीज ग्राहकांची लूटमार करत आहेत.
तसेच एप्रिल महिन्यात देण्यात आलेल्या बिलासोबत अनामत रक्कम बिल देण्यात आले आहे. सदरची अनामत रक्कम भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्राहक संरक्षण कक्षच्या माध्यमातून निवेदीत करण्यात आलेल्या मागण्यांचा महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन लवेकर यांनी दिले. तर ग्राहकांना अनामत रक्कम भरण्याची कोणतीही सक्ती नाही असे जाहीर केले. यावेळी येथील कार्यकारी अभियंता लवेकर ह्यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा ग्राहक संरक्षण कक्षच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, कक्षतालुकाप्रमुख सूरज कदम, कक्ष शहरप्रमुख सतीश शिंदे, कक्ष कार्यालय प्रमुख अजित पवार, उपतालुकाप्रमुख विजय जाधव, कक्ष विभागप्रमुख महेंद्र आमरे,अनिल राक्षे, सौरभ फागे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्याकडे निवेदन देताना संतोष सुर्वे आणि पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहेत
(छाया : ओंकार रेळेकर)