(पुणे)
कुंपणात उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील एनडीए रोडवरील शिवणे परिसरात घडली आहे. शुभम बाळू इंगोले (वय-16 रा. ढोणे हाइट्स, शिंदे पुलाजवळ, शिवणे) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. शुभम शिवणे येथील नवभारत हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता.
शुभम इंगोले शिवणे भागातील देशमुखवाडी परिसरातील लहान गल्लीतून मित्राबरोबर शाळेत जात होता. तेथील एका कुंपणाच्या लोखंडी जाळीत वीजप्रवाह उतरला होता. शुभमचा कुंपणाच्या जाळीला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार शॉक बसल्याने तो जागेवर कोसळला. गंभीर जखमी झालेल्या शुभमला तेथील नागरिकांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
डॉक्टरांनी शुभमला तपासले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.