(ठाणे)
ठाणे दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “सध्याचं राजकारण गलिच्छ झालंय. महाराष्ट्रातील बंडाळीमुळे देशभरात बदनामी झाली. लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय होता हे सर्वांना माहिती आहे. निष्ठावंत निखारे शिवसेनेसोबत आहेत. उद्या याच निखाऱ्यांच्या मशाली होतील” असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधून शिंदे गटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, “निष्ठेच्या पांघुरड्याखाली काही लांडगे घुसले होते, त्यांच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, शिवसेनेचीही बदनामी झाली. जाणाऱ्यांना जाऊद्या निष्ठावंत माझ्यासोबत आहेत. कोण विकले गेले? हे सर्वांनाच माहिती आहे. एका गोष्टीचे समाधान आहे. राज्यात सध्या जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा राजकारणात आला आहे. तो दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. लवकरच ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाण्यात जाहीर सभा घेणार घेणार आहे, सभेत कोणाचा समाचार घ्यायचा, तो मी घेईन”, असे उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौऱ्यात म्हटलं आहे.