आपल्या घरात पुढीलप्रमाणे वास्तुशास्त्राचे नियम पाळा, घरात नक्कीच सुख शांती लाभेल.
घरामध्ये खुप आजारपण, अपयश, चिड – चिड, कर्जबाजरी होणे अशा गोष्टी होत असतील तर घराच्या ईशान्य, उत्तर व पुर्व दिशेच्या प्रभागामध्ये भरपुर लाईट किंवा प्रकाश योजना करावी. निळा, आकाशी, दुधी व पांढरा रंग असा स्वच्छ प्रकाश देणारे झुंबर, हंड्या अथवा एल.ई.डी लाईटच्या सहाय्याने भरपुर प्रकाश योजना करावी, म्हणजेच ईशान्येतील सकारात्मक ऊर्जा वाढुन घरामध्ये चांगले रिझल्ट मिळतात.
घरातील सर्व बेडरूमच्या ईशान्य, पुर्व, उत्तर दिशेमध्ये कोणतेही कपाट, बेड, इस्त्री, इन्व्हरटर, ए.सी अथवा पाण्याचा साठा, बंद पडलेल्या वस्तु, अडगळ भंगार ठेवु नये. त्यामुळे ईशान्य दिशेमध्ये जडत्व व नकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र तयार होऊन झोपेवर परिणाम होतो. निद्रानाशेचा विकार होऊ शकतो व आरोग्य बिघडत जाते त्यामुळे बेडरूमची ईशान्य दिशा हलकी ठेवावी व दक्षिण – नैऋत्य जड करावी.
शरीरातील उर्जेची कमतरता अन्नाबरोबर घरातील ऊर्जा सुद्धा भरून काढण्यास मदत करत असते. जसे आपण शुद्ध व सात्विक अन्न रोज खातो, स्वच्छ पाणी पितो त्याचप्रमाणे घरातील उर्जेचे वलय शुद्ध सात्विक राहावे आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरातील शुभ उर्जेची मदत व्हावी यासाठी आपले घर योग्य अनुभवी वास्तुतज्ञाकडून आपले घर वास्तुनुसार करून घ्यावे.
घरामध्ये संपुर्ण हॉल मध्ये कधीही अंधार ठेवु नये. हॉल मधील खिडक्या – दारे सकाळच्या वेळेमध्ये उघड्या ठेवाव्यात आणि भरपुर प्रकाश घरामध्ये येईल अशा पद्धतीने हॉलची रचना असावी आणि सुर्यास्तानंतर सुद्धा हॉल मध्ये एल.ई.डी दिवा, झुंबर अशा विविध प्रकारच्या भरपुर प्रकाश देणारे लाईट्स लावुन आपल्या घराचा हॉल जास्तीत जास्त ऊर्जा वर्धक ठेवावा. याचे कारण घराचा हॉल म्हणजे आपला चेहरा आहे तो अतिशय शुद्ध, सात्विक व प्रकाशमान नेहमी ठेवावा. त्यामुळे भाग्यातले अडथळे दुर होतात.
दर ३ ते ६ महिन्यांनी घरातील झाडू, फरशी पुसण्याचे कापड, पाय पुसणे, कचरा पेटी बदलावी रोज त्याचा वापर केल्यामुळे त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेली असते. अनेक दिवस त्या वस्तु वापरल्याने त्यामध्ये धुळ, जीवाणु, सुक्ष्म जंतु जाऊन बसतात व त्याचा पुन्हा वापर केल्याने ते घरात पसरून आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात.
रोज सकाळी ६ ते ९ या वेळेत घरातील देवांची पुजा ईशान्य दिशेमध्ये रोज नित्य नियमाने करावी. देवांच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने आंघोळ घालुन पुसून अष्टगंध लावुन फुले वहावीत. ताजे सुंदर फुल वहावे धुप, दीप, उदबत्ती लावावी. निरंजनाने देवाला ओवाळावे. दुध साखरेचा नैवेदय दाखवावा नामस्मरण करीत पुजा करावी. श्लोक वाचावे, आरती करावी व अशीच नित्य सेवा दररोज करून घे व मला आणि कुटुंबाला कायम सुखी ठेव, आरोग्यदायी जीवन दे अशी रोज प्रार्थना करावी.
घरातील देवघरामध्ये तेलाचा दिवा, समई किंवा निरंजन देवघराच्या आग्नेयेला ठेवावे देवघरामध्ये कोणत्याही प्रकारचा बल्ब लावु नये. त्यामुळे देव पुजा केल्यानंतर देवतत्वाचे तेज विजेच्या दिव्यामुळे लोपले जाते व आपल्या घराला देव पुजेचा लाभ होत नाही. म्हणुन मोठमोठ्या मंदिरामध्ये देवाच्या गाभाऱ्यात तेल तुपाचे दिवे किंवा समया सतत चालु ठेवल्या जातात कोणतेही ट्युब लाईट वापरल्या जात नाही. (उदा – तिरुपती बालाजी मंदिर).
धनवृद्धी साठी नक्षीदार सोनेरी रंगाची गजलक्ष्मी म्हणजेच सोनेरी नक्षीदार हत्ती ज्याची सोंड सलामी देणारी छोट्या आकाराचा हत्ती उत्तरेला तोंड करून घरामध्ये ठेवावा. त्याची स्थापना कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी पंचागामध्ये शुभ दिवस पाहुन त्याची स्थापना करावी आणि दिवाळीच्या लक्ष्मी पुजनाला त्याची पुजा करावी. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी आगमन वाढते आणि मिळालेले धन स्थिर राहण्यास मदत होते.
घरामध्ये पैसे टिकत नाहीत याचे कारण आपण घरामध्ये पैसेच ठेवत नाही आपल्या घराची तिजोरी घराच्या नैऋत्य दिशेला म्हणजेच दक्षिण व पश्चिमेच्या कोपऱ्यामध्ये ठेवावी आणि तिजोरीमध्ये कमीत कमी ५ ते १०.००० रुपये कॅश कायम ठेवावी. तिजोरी किंवा कपाट ठेवणे शक्य नसेल तर नैऋत्य दिशेला पैशाच्या नोटांचे रेडीमेड पोस्टर किंवा पेंटिंग लावणे. त्यामुळे पैसे घरामध्ये साठण्यास मदत होते व पैशाला पैसा जोडत राहिला कि आपण हळुहळु श्रीमंतीकडे वाटचाल करू लागतो.
घरामध्ये असणारे टॉयलेट, बाथरूम, ड्राय बाल्कनी याचे दरवाजे कायम स्वरूपी बंद ठेवावेत दरवाजे उघडे ठेवल्यामुळे टॉयलेट, बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरते आणि प्रदूषित वातावरणामुळे घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य बिघडते यामुळे टॉयलेट, बाथरूम मध्ये कागदी कपामध्ये खडे मीठ घालुन ठेवणे व ते दर पंधरा दिवसांनी बदलणे आणि टॉयलेट, बाथरूमच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवणे.
(उर्वरीत पुढील भागात)