(चिपळूण / ओंकार रेळेकर )
शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रा. लि. गेल्या काही महिन्यांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेला हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पिंपळीखुर्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे. या क्षेत्रातून त्यांनी गरजूंना सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा करतांना सुशिक्षित तरुणांना व्यवसायासाठीदेखील वेळेत कर्ज पुरवठा करून स्वावलंबी बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. मात्र, कोकणातील शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, ही त्यांची भूमिका नेहमीच होती. त्यांच्याच मार्गदर्शनातून पिंपळीखुर्द येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची मुहूर्तमेढ करण्यात आली. दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन घेतले जात आहे. या उत्पादनांना ग्राहकांची उत्तम पसंती मिळत आहे.
या प्रकल्पांतर्गत मालघर, पिंपळीखुर्द (ता. चिपळूण) आंबडस, चिंचघर दस्तुरी (ता. खेड), कापसाळ आदी ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संकलन केंद्रांना शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आता या प्रकल्पाचे रविवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील तसेच आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, आ. भास्कर जाधव, माजी आ. सदानंद चव्हाण, आ. प्रसाद लाड उद्योजक लक्ष्मणराव कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तरी या उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व या प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे.