मुंबई – गोवा महामार्गअंतर्गत शहरातील वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेख नाका पुलाची एकेरी वाहतूक १५ जूनच्या आत सुरू हाेण्याच्या दृष्टीने कामाला वेग आला आहे. या कामाची खा. विनायक राऊत यांनी गुरुवारी पाहणी करून आढावा घेतला.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी बहादूरशेख नाका पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, ईगल कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर. आर. मराठे, कर्मचारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित हाेते. यावेळी राऊत यांनी बहादूरशेख नाका पुलाच्या कामाची कळंबस्तेच्या बाजूकडून चिपळूण शहरापर्यंत पाहणी केली.
यावेळी मराठे यांनी पुलाच्या कामाची माहिती दिली. पुलाच्या ५६ गर्डरपैकी ४९ गर्डर पिल्लरवर चढवून पूर्ण झाले आहेत. उर्वरित गर्डर येत्या तीन दिवसांत चढविले जाणार आहेत. त्यानंतर पुलावरील काँक्रीटीकरण व अन्य काम केली जातील. आतापर्यंत पुलाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाची एकेरी वाहतूक सुरू होईल, या दृष्टीने प्रयत्न आहे.