(चिपळूण)
वाशिष्ठी नदीपात्रात १५ लाख अथवा ७० लाख क्युबिक मीटर गाळ असला तरी तो सर्व गाळ काढण्यास शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी आचारसंहितेनंतर मंत्रालयात संयुक्त आढावा बैठक घेतली जाईल. गाळ काढण्यासाठीची यंत्रणा वाढवली जाईल. त्याबरोबर नाम फाउंडेशनचेही सहकार्य घेतले जाईल. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचा हा शासनाचा पायलट प्रोजेक्ट आहे. इथे निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण बचाव समितीला दिला.
वाशिष्ठी व उपनद्यातील गाळ काढण्यास गती मिळण्यासाठी चिपळूण बचाव समितीने 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी समिती सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर चिपळूण बचाव समितीने 26 जानेवारीला होणारे उपोषण स्थगित केले.