(रत्नागिरी)
संपूर्ण देशभर चर्चेत असलेल्या राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील संशयिताने दुसऱ्यांदा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. न्यायालयाने अखेर बुधवारी (ता. 21) न्यायालयाने संशयिताचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे.
6 फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास राजापूर पेट्रोलपंप येथे पंढरीनाथ आंबेरकर या संशयित आरोपीने आपल्या थार गाडीने पत्रकार वारिशे यांच्या दुचाकीला चिरडले. या अपघातात शशिकांत वारिशे गंभीर जखमी झाले. कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पत्रकार वारिशे यांचा मेहुणा अरविंद दामोदर नागले यांनी राजापूर पोलिस ठाण्यात संशयित आंबेरकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी संशयित आंबेरकर याला अटक केली. न्यायालयाने आंबेरकर याला न्यायालयीन कोठडी रवानगी केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. संशयित पंढरीनाथ आंबेरकर याने दुसऱ्यांदा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायाधीश आंबळकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. फणसेकर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने बुधवारी संशयित आंबेरकर याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळून लावला आहे.