( रत्नागिरी / प्रतिनिधी )
ओम साई स्पोर्टस् आयोजित व मा.ना. उदयजी सामंत पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे चालू असलेल्या डे – नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ लीग स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम सामना वाय सी सी पावस संघ विरुध्द एस एस सी सी डोंबिवली संघामध्ये झाला. यामध्ये वाय सी सी पावस संघाने एस एस सी सी डोंबिवली संघावर मात करून विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना वाय सी सी पावस संघाने ६ षटकांमध्ये ८३ धावा केल्या. यात इजाज कुरेशी यांनी विस्फोटक फलंदाजी करत १७ चेंडू १ चौकार व ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ३९ धावा केल्या. त्याला कृष्णा सातपुते यांनी १२ धावा, प्रशांत घरत ११ धावा, नितीन माटुंगे १३ धावांची मदत केली. डोंबिवली संघाकडून हर्षद ठोंबरे यांनी २ गडी व संकेत पाटील १ गडी बाद केला. एसएससीसी डोंबिवली संघाकडून ८३ धावांचा पाठलाग करताना ६ षटकात अवघ्या २८ धावा करता आल्या. हा सामना वाय सी सी पावस संघाने एकतर्फी जिंकला. वाय सी सी पावस संघाकडून राकेश कहर यांनी २ षटकात ६ धावा देत ३ गडी बाद केले. तर इमरोज खान, अनिकेत सिंग, कुणाल ठाकूर यांनीही उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार इजाज कुरेशी याला देण्यात आला.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज वायसीसी पावस संघाचा प्रशांत घरत, उत्कृष्ट गोलंदाज एस एस सी सी डोंबिवली संघाचा हर्षद ठोंबरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्मार्ट नीट रायगड संघाचा अंकुर सिंग यांना प्रत्येकी ११,१११ रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
विजेता वाय सी सी पावस संघाला ५,५५,५५५ रोख रक्कम व चषक, उपविजेता एस एस सी सी डोंबिवली संघाला ३,३३,३३३ रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील मालिकावीर याला ठाणे येथील उद्योजक नरेश शेठ भोईर यांच्याकडून टीव्हीएस रोनिन टू व्हीलर बाईक पारितोषिक वाय सी सी पावस संघाचा इजाज कुरेशी याला देण्यात आली.
तसेच स्पर्धेतील उगवता तारा शिवांश स्पोर्टस संघाचा अक्षय घरत याला प्रतिक जयू सावंत याज कडून २२,२२२ रोख रक्कम व चषक गौरवण्यात आले.
बक्षीस समारंभाचे वेळी उद्योजक गजेंद्र पाथरे, पार्थ पाथरे, बिपिन बंदरकर, दीपक पवार, पराग सावंत, बाळू साळवी, एडवोकेट संकेत घाग, जिल्हा कारागृह अधिकारी वसीम इनामदार, राजन शेटे, रजनीश परब व इतर मान्यवर उपस्थित होते.