(रत्नागिरी)
शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर , माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. वानरांचा बंदोबस्त व्हावा व भयमुक्त शेती करता यावी, या मागणीकरिता आज गुरुवार दि. ५ पासून अविनाश काळे हे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
अविनाश काळे यांनी या मागणीसाठी यापूर्वीही लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महत्त्वाची सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात घेण्यात आली होती. त्यालाही शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती होती . त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासंदर्भात निवेदन पाठविण्यात आली आहेत. मात्र, अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याने काळे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.