(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे बौध्दवाडी येथे दोन शेजार्यांच्यात भांडण लावून देण्यास माकड कारणीभूत ठरले आहे. त्याचे असे झाले की, घराजवळ आलेल्या वानरांना हाकलत असताना वानराने एकाच्या घराची कौले फोडली. यातून वाद उफाळल्याने बंदूक आणून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष तुकाराम जाधव, प्रतिज्ञा संतोष जाधव (दोन्ही रा. चाफे बौध्दवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याबाबतची फिर्याद संगिता वसंत जाधव (65, चाफे बौध्दवाडी, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस स्थानकात दिली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रतिज्ञा जाधव यांनी आपल्या घराजवळ आलेल्या वानरांना हाकलल्यामुळे ते वानर फिर्यादी संगीता जाधव यांच्या घरावर आले. त्यांनी घराची कौले व पत्रे यांचे नुकसान केले. याचा जाब संगीता यांनी प्रतिज्ञा यांना विचारल्याने राग मनात धरुन संगीता यांना शिवीगाळ करत त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी संशयित आरोपी प्रतिज्ञा यांचा पती संतोष याने आपल्याकडे असलेली बंदूक आणून फिर्याद संगीता यांना तुला ठार करतो अशी धमकी दिली.
संगीता यांनी जयगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष आणि प्रतिज्ञा या पती-पत्नीवर भादविकलम 504, 506, 34 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.