(मुंबई)
वादग्रस्त विधानानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “मी राज्यातील कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. राजकारणामध्ये टीका होतच असते. यातूनच मी बोललो. माझ्या विधानामुळे कोणाचा अवमान झाला असे वाटत असेल तर मी सॉरी.”
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सुप्रियाताई सुळे यांच्याबदद्ल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरुन सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “आम्हालाही बोलता येत, पण आम्ही तसं बोलणार नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात फिरणे अवघड करु. अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलू शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या… नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल.” तर ट्विट करतही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.