(गुहागर)
गेल्या काही वर्षात मच्छिमारांवर एका पाठोपाठ एक अशी अनेक संकटे येत आहेत. समुद्रात वाढत असलेले प्रदूषण, भूगर्भ सर्वेक्षणादरम्यान केले जाणारे स्फोट, बेकायदा मार्गाने होणारी मासेमारी अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. याचाच परिणाम हा पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर होत असून माशांची आवक कमी होऊ लागली आहे.
हर्णे, दाभोळ, असगोली, जयगड यांसह इतर भागातून मोठया संख्येने मच्छिमार हे बोटी घेऊन मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातात. मात्र मागील काही वर्षांपासून एका पाठोपाठ एक अशी संकटे उभी राहत असल्याने या मच्छिमारांचा पारंपारिक व्यवसाय हा डबघाईला येऊ लागला आहे. समुद्रातील प्रदूषण वाढीस लागत आहे. तर दुसरीकडे तेलसाठे शोधण्यासाठी समुद्रात मागील काही वर्षापासून भूगर्भ सर्वेक्षण सुरूच आहे. यामुळे अधूनमधून पाण्यात स्फोट घडवून आणले जात आहेत. याचा परिणाम हा समुद्रातील मत्सजीवांवर होऊ लागला आहे. त्यातच एलईडी व पर्ससिनद्वारे मासेमारी करण्यास बंदी असतानाही त्यामार्फत बेकायदा मासेमारी होत आहे याचा परिणाम पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर होऊ लागला आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली आहे. मात्र पुरेशा प्रमाणात मासेच जाळ्यात येत नसल्याचे मच्छिमारांनी सांगितले आहे. बोटिंसाठी हजारो रुपयांचे इंधन लागते. बोट समुद्रात नेल्यावर मात्र मासळी हाताशी लागत नसल्याने मच्छिमारांच्या पदरी निराशा पडू लागली आहे. माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत तर दुसरीकडे ज्या काही प्रजाती शिल्लक आहेत त्यांना वाढीसाठी विशिष्ट वेळ दिला जात नसल्यामुळे समुद्रातील मासे कमी होत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
सरकारचे दुर्लक्ष
सरकारकडे सातत्याने मच्छिमारांचे प्रश्न मांडले जातात. परंतु सरकार पारंपारिक मच्छिमारांची उन्नती व शाश्वत विकास याकडे लक्ष देत नसल्यामुळे विविध प्रकारच्या कारणांमुळे माशांची आवक घटली आहे. शासनाने आता तरी पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
भगवान वनकर ( तांडेल, दापोली )
इंधन दरवाढीच्या झळा
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वचजण मेटाकुटीला आले आहेत. या वाढत्या इंधन दरवाढीचा फटका हा मच्छिमार बांधवाना पण बसू लागला आहे. बोटींना लागणारे डिझेल मच्छिमारांना १२४ प्रतिलिटरने घ्यावे लागत आहे. तेच इंधन इतरत्र १०५ रुपये लिटर आहे. त्यामुळे मच्छिमारांना बोटींसाठी जवळपास अधिकचे २२ ते २५ रुपये मोजावे लागत आहेत. त्याच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले.