(राजापूर / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील वाटूळ गावांमधील धनगरवाडीतील ग्रामस्थ लहू गोविंद गोरे यांच्या ११ शेळ्यांवरती जंगलातील कोलसुंदे या हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला करून काही शेळ्या फस्त केल्या आहेत. तर काही शेळ्या जखमी झाल्या आहेत. तर ५ शेळ्या बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये लवू गोरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरे यांनी रविवारी (२६ फेब्रुवारी २०२३) नेहमीप्रमाणे दुपारी १२ वाजता गोठीतून ७० शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या.
या शेळ्या गावातील महादेव मंदिराच्या बाजूला भर वस्ती शेजारी असलेल्या साल बांबर या ठिकाणी सायंकाळी ५ ते ५.३० वाजता या भागात आल्या असता कोलसुंदे नावाच्या कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या २० ते २५ हिंस्त्र प्राण्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. लहू गोरे व त्यांची पत्नी सुवर्णा लहू गोरे या शेळ्या चरवण्यासाठी गेल्या होत्या. हा प्रकार पाहून दोघेही भांबावून गेली होती. त्यांची आरडाओरड पाहून महादेव वाडीतील मुले, महिला व ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले. व त्या हिंस्त्रप्राण्यांना पळवून लावले. पळवून लावत असताना ते प्राणी त्यांच्या अंगावर येत होते. यामध्ये मनीष गुरव,सार्थक गुरव, कृष्णा गुरव, अरविंद गुरव, संजय चव्हाण, हेमंत चव्हाण, दशरथ वीर, बाळू चव्हाण व महिलांचा समावेश होता.
या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे वनपाल, एस व्ही घाडगे, सुरेश तेली वनरक्षक प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल झाले. व पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान गोरे यांना योग्य ती नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे वनपाल एस. व्ही. गाडगे यांनी म्हटले आहे.