(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाळा दीक्षाभूमी येथील बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या कार्याध्यक्षपदी वाटद गावचे सुपुत्र आणि धडाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील तथा भाई जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविवारी बावीस खेडी बौद्धजन संघाच्या विशेष सभेचे आयोजन दीक्षाभूमी बुद्ध विहार वाटद खंडाळा येथे करण्यात आले होते.
तसेच संघटनेच्या प्रमुख सरचिटणीसपदी वाटद- पूर्व येथील युवा कार्यकर्ते स्वप्निल जाधव तर सहचिटणीस म्हणून प्रशांत मोहिते (जयगड) आणि मंगेश पवार ( कासारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्यकारिणीतील उपसभापती निवृत्त माजी सैनिक आणि कोळीसरे गावच्या तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष आर.डी. सावंत तर उपाध्यक्षपदी भालचंद्र कांबळे (आगरनरळ)आणि राजन जाधव (साखरी जयगड) तसेच कोषाध्यक्षपदी कळझोंडी गावचे विद्यमान सल्लागार आणि पत्रकार किशोर पवार यांची तर हिशोब तपासणीस म्हणून गडनरळ येथील जेष्ठ कार्यकर्ते धर्मदास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर उर्वरित कार्यकारिणी सदस्यांमध्ये दिनेश कदम निवेंडी, कुलदीप जाधव वरवडे,राहुल जाधव सैतवडे, विश्वास जाधव भगवतीनगर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. एकूणच बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा व नियुक्ती आणि विशेष सभेचे आयोजन संघटनेचे माजी अध्यक्ष शरद रामचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि नामांकित क्रिडा शिक्षक राजेश जाधव उपस्थित होते. या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई जाधव यांची निवड करण्यात आल्याने वाटद- खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहाराच्या परिसरात नव्याने विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल तसेच विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी करताना दीक्षाभूमी बुद्धविहाराच्या नावलौकिकास नवा साज येईल, असा आशावाद संपूर्ण बावीस खेडी बौद्धजन संघाच्या गावशाखांमधून व्यक्त केला जात आहे. या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार व त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकारणीकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच बावीस खेडी बौद्धजन संघाच्या गावशाखांचे सर्व प्रमुख प्रतिनिधी व बंधू-भगिनींकडून अभिनंदन केले जात आहे.