(मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असं नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
#WATCH | "Bandra-Versova sea-link bridge will be named after VD Savarkar and will be known as Veer Savarkar Setu," announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of #SavarkarJayanti pic.twitter.com/la9RbZlLf8
— ANI (@ANI) May 28, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात अनेक कार्यक्रम सुरु आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समुद्र यांचं नातं आहे. ते लक्षात घेऊन वांद्रे-वर्सोवा या समुद्र सेतुला ‘स्वातंत्र्यीवर सावरकर समुद्र सेतू’ अशा प्रकारचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत, शौर्य दाखवणारे आणि संकटातून अनेकांची मुक्तता करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून केली होती.