(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट आशा सेविका व गटप्रवर्तकांचा नुकताच पारितोषिक वितरण सोहळा जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. जिल्हयातून सर्वाधिक कामावर आधारीत आशा स्वयंसेविकांचा गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील 2 आशा स्वयंसेविका, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील 1 अशा स्वयंसेविकांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी कोरोना कालावधीत मोलाचं सहकार्य करणार्या आणि कोरोनामुक्त गाव ठेवण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणार्या संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील आशा सेविका प्रज्ञा प्रवीण डांगे यांचा रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सर्व आशा सेविकांचे कौतुक केले. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले तसेच माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राजन शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते.
वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 17 गावे आहेत. यामध्ये पांगरी, घोडवली, चांदिवणे, तळेकांटे, वांद्री, कानरकोंड, मानसकोंड, आंबेड बु., सोनगिरी, कोळंबे, परचुरी, गावमळा, कुरधुंडा, ओझरखोल, निढळेवाडी, माभळे यांचा समावेश आहे. हे सर्व गाव मिळून एकूण 10 आशा सेविका कार्यरत आहेत. या 10 आशा सेविकांमधून सर्वोत्कृष्ट आशा सेविकेचा पुरस्कार हा वांद्री येथील प्रज्ञा डांगे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.