(रायगड)
अलिबाग- मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांची एमएसईबीच्या अधिकाऱ्यांला दमबाजी केल्याचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आमदार त्या अधिकाऱ्याला बिलांची वसुली करू नये असा सांगत आहेत. तसेच त्याला शिविगाळ करत बदली करून घे नाहीतर फटवण्याची भाषाही केली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या दळवी यांनी त्या अधिकाऱ्याचा मर्डर करण्याचीही धमकी दिल्याचे या ऑडिओतून स्पष्ट होत आहे.
मुरूडमध्ये एमएसईबीकडून बिलांची वसुली सुरू आहे. त्याप्रकरणी आमदार महेंद्र दळवी यांनी एमएसईबीच्या राठोड नावाच्या अधिकाऱ्याला फोन केला. त्यानंतर या भागात वसुली करू नको, मंथ एन्ड आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावर त्या अधिकाऱ्याने आपल्या हाती ते नसल्याचं सांगितले. आमदार दळवी यांनी त्यानंतर राठोड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणी केली. त्यावेळी आमदार दळवी यांनी त्या अधिकाऱ्याला अर्वाच्च शिवीगाळ केली आणि धमकी दिल्याचं दिसून येतंय. आमदार दळवी त्या अधिकाऱ्यासोबत बोलताना म्हणतात की, मार खाण्यापेक्षा बदली करून निघून जा. एकतर बदली करून घे नाहीतर फटकवेन. तसेच आपल्या पोरांना सांगून त्या अधिकाऱ्याला ठोकून काढण्याची भाषा दळवींनी केली. तो अधिकारी बिलांच्या वसुलीसाठी गेला तर त्याचा मर्डर अटळ असल्याचं दळवींनी या ऑडिओमध्ये म्हटल्याचं दिसून येतंय. तसेच या प्रकरणी आपण शेवटची वॉर्निंग देतो असंही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना आमदाराशी बोलायची पद्धत माहिती नाही असं दळवींनी म्हटलंय. मुरुडमध्ये एमएसईबी अधिकाऱ्याकडून लोकांना त्रास देण्यात आल्याचे दळवी यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. त्यानंतर अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा त्याला माझी पोर मारतील असं आमदार महेंद्र दळवी म्हणत आहेत. या संबंधी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. महेंद्र दळवी हे शिंदे गटाचे आमदार आहेत.
दरम्यान,आमदार दळवी यांनी या धमकीप्रकणी स्पष्टीकरण दिलं आहे. महेंद्र दळवी यांनी याबाबत टीव्ही ९ मराठीशी फोनवरून संवाद साधला. यावेळी आमदार दळवी म्हणाले, “आमच्या मुरूड तालुक्यात हा राठोड नावाचा अधिकारी आहे. मी त्याच्याकडे विनंती केली होती की, या महिन्याच्या अखेरीस मुरूड तालुक्यात देशभरातून पर्यटक येतात. ३१ डिसेंबरनिमित्त मुरूडमध्ये पर्यटकांची रेलचेल असते. मतदासंघातील एका व्यक्तीचं एक हजार रुपयांचं वीजबिल थकित आहे. मी राठोड यांना म्हटलं की, ५ जानेवारीनंतर तुम्ही ही वसुली करा, कारण सध्या लोकांकडे पैसे नाहीत. लोकांना ५ जानेवारीपर्यंतचा अवधी द्या. मी त्यांच्याकडे १० वेळा विनंती केली.”
आमदार महेंद्र दळवी म्हणाले, हा अधिकारी गेल्या काही दिवसांपासून लोकांना दमदाटी करतोय. त्यांना लोकांना सांगतोय ‘मी असा वागलो तरच माझी बदली होईल.’ त्यामुळे मी त्याच्या वरिष्ठांशी बोललो आणि त्याची बदली करायला सांगितलं. त्याला लोकप्रतिनिधींशी कसं बोलायचं तेच कळत नाही, त्याचं वागणं, बोलणं योग्य नव्हतं. खरंतर त्याला बदली हवी आहे, म्हणून तो असा वागतोय. मी माझ्या धमकीचं समर्थन करत नाही. परंतु, त्याचं बोलणंदेखील योग्य नव्हतं.