(मुंबई)
मागील आठ महिन्यांत राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप सविस्तर भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच आज 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून राज ठाकरे यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्याच वर्धापन दिनाचा टीझर आता मनसे ने जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे वर्धापनदिनी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज मनसैनिकांना कोणता आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा टीझर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी मनसेच्या काही महत्वाच्या आंदोलनाची दृष्ये दाखवली आहेत. त्याबरोबरच राज ठाकरेंच्या भाषणातील काही मोजके क्षण देखील घेतले आहेत.
काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यातील राजकारणाचा चिखल झाला आहे. त्यावर मी गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार आहे. त्यावेळी ट्रेलर, टीझर नाही तर पूर्ण सिनेमाच दाखवणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. तर आज साजरा होणाऱ्या मनसेच्या १७ व्या वर्धापनदिनाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर प्रसिद्ध करताना नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज’ असे ब्रीद वाक्य देखील टाकले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या वर्धापन दिनी काय नवीन घोषणा करणार याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा असताना दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा पहिल्यांदाच ठाण्यात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शहरात ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली आहे. सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे.