(दापोली)
आर.व्ही.बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन दापोलीच्या न.का.वराडकर कला आणि रा.वि.बेलोसे वाणिज्य महाविद्यालयात शिशिर महोत्सवाअंतर्गत दि.२२ डिसेंबर रोजी सांस्कृतिक विभागामार्फत विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने रांगोळी स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ.भारत कऱ्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ असून त्याचा उपयोग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य व देश पातळीवर करून महाविद्यालयास नावलौकिक मिळण्यासाठी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होणे म्हणजे विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सफल झाला असे प्राचार्य डॉ.भारत कऱ्हाड म्हणाले.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. या प्रदर्शनात साधारणपणे १५ ते २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध रंगानी साकारलेल्या १२ ते १५ सुबक रांगोळ्या महाविद्यालयाचे आकर्षण ठरले. दोन्ही स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी प्रा. विजया खानविलकर, प्रियंका काशिद,नयना कांबळे, दिपाली शेठ उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी व सहभागी सर्व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.