(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथे नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. वरवडे गाव हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. खारवी समाज हा मासेमारी या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांचे दैवत म्हणजे समुद्र होय. कारण जी देवता आपल्याला धन देते. तिचे पूजन करणे, हे या समाजाचे पहिले कर्तव्य मानून हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो.
दोन महिने मासेमारी बंद आणि समुद्र खवळलेला असतो. तो शांत व्हावा आणि मासेमारीसाठी नव्या उमेदीने, नव्या जोमाने, सुख दुःख विसरून नव्या वर्षांची सुरुवात चांगली व्हावी म्हणून हा समाज दर्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झालेला असतो. आमचे तू कायम रक्षण कर आणि खूप मासळी मिळू दे, अशी प्रार्थना करण्यासाठी श्रावण महिन्यातील नारळीपोर्णिमा या दिवसाचे औचित्य साधून वरवडे खारवीवाड्यातील खारवी समाजाने यामध्ये पुरुष व महिला यांनी मोठ्या उत्साहाने नारळीपोर्णिमा साजरी केली.