वैभव पवार, गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील प्रसिद्ध असलेल्या धबधब्या नजीकचा मुख्य रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून खचलेल्या स्थितीत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत किंवा नव्याने रस्ता करण्याबाबत कुठलीही कार्यवाही हाती घेण्यात आलेली नाही. याउलट गेल्या सहा महिन्यांपूर्वी येथील रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोकादायक फलक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेला आहे परंतु हा फलक आता केवळ शोभेचा देखावा ठरत असून नेमकी रस्त्याची डागडुजी करणार तरी कधी? असा प्रश्न आता स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
निवेंडी ते चाफे या मुख्य मार्गावर हा रस्ता जोडला गेला आहे. तसेच येथील प्रसिद्ध असलेल्या धबधब्याच्या अवघड वळणावर हा रस्ता असल्याने या रस्त्यावरून नेहमीच लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. तसेच एसटी महामंडळाच्या फेऱ्या देखील याच रस्त्यावरून होत असतात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा मानला जात असतानाही अद्यापही या रस्त्याच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच या रस्त्याच्या एका बाजूने खचला असल्याने याच रस्त्याच्या खाली सुमारे दोनशे फूट खोल दरी आहे. या दरीत एक वाहन दुसऱ्या वाहनाला साईट देताना तोल जाऊन गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे येणार्या जाणार्या वाहनांची वाहतूक लक्षात घेता या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे असल्याचे मत सध्या व्यक्त होत आहे. एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच गेल्या सहा महिन्यांपासून हा फलक लावून देखील अद्यापही कार्यवाही न झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.