( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूण-फुरुस येथील गवा रेड्याच्या हल्यात मृत पावलेल्या सतिश जाधव यांच्या कुटुंबियांना वन विभागाकडून 15 लाखाची मदत जिल्हाधिकारी बी. एन. पाटील व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आली. मौजे फुरुस, ता. चिपळूण येथील तरूण सतिश जाधव यांच्या वरती 18 जुलै 2022 रोजी गव्यारेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात 7 ते 8 दिवस उपचार सुरू होते परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी अक्षता जाधव, मुली आर्या व अदिती जाधव, आई, वडिल व भाऊ असा परिवार आहे.
मृत व्यक्तिच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 15 लाखांची मदत प्राप्त झाली. प्राप्त झालेली मदत मृताच्या वारसांना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, आमदार शेखर निकम, तहसिलदार जयराज सूर्यवंशी, सहाय्यक वनरक्षक चिपळूण सचिन निलक, माजी सभापती पुजा निकम, वनपाल डि. आर. भोसले यांच्या उपस्थितीत सतिश जाधव यांची पत्नी अक्षता सतिश जाधव व कुटुंबियांकडे 5 लाखाचा धनादेश व 10 लाखाची एफडी प्रमाणपत्र देण्यात आले. सदरची मदत तातडीने मिळावी यासाठी विभागीय वनाधिकारी चिपळूण दिपक खाडे, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री किर, सहाय्यक वनरक्षक चिपळूण सचिन निलक व वन विभागाचे कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी फुरुसचे सरपंच शांताराम कदम, उप-सरपंच सचिन खर्डे, पोलिस पाटील संजय कदम, ग्रा. स. अरविंद कदम, सामाजिक कार्यकर्ते संतोष निकम, राजु जाधव, दुर्गवाडीचे संजय कदम, वडील शांताराम जाधव व भाऊ सुशिल जाधव, सुनिल जाधव, महेंद्र जाधव, वनरक्षक मंत्रे व वन विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.