(लांजा)
तालुक्यातील आगवे येथे काजूच्या बागेत फासकीत अडकलेल्या बिबट्याने मोठ्या जिकिरीने स्वतः ची सुटका करून घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) सकाळी निदर्शनास आली. लांजा वनविभाग पथकाच्या समोरच बिबट्याने सुटका करून घेतली. मात्र आता फासकी लावणाऱ्याचा शोध वनविभाग घेत आहेत.
आगवे (ता. लांजा जि. रत्नागिरी) येथे फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती १९ मे रोजी सकाळी पोलिस पाटीलांनी दूरध्वनीवरुन लांजा वनपाल दिलीप आरेकर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता आशा प्रकाश देवळेकर यांच्या काजू बागेच्या कंपाऊंडला असलेल्या निवडूंगाच्या झुडूपाला लावलेल्या तारेच्या फासकीत बिबट्या अडकलेला होता. ही माहिती मिळाल्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी पाहणी केली. त्याचवेळी बिबट्याने फासकीला जोरात हिसका दिल्यामुळे बिबट्याची फासकीतून सुटका झाली आणि तो जंगलात पळून गेला. आता त्या जागेत फासकी लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध वन विभागामार्फत सुरू करण्यात आला आहे.