(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
कोकणातील व पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी प्रथमच वन्यप्राणी व पक्षी यांच्या उपचारासाठी ट्राझिंट ट्रीटमेंट सेंटर कर्हाड येथे सुरु होणार आहे. यासाठी 7 कोटी 57 लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील वन्यजीवांवरही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार होणार आहेत.
जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करताना पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. परंतु मूलतः वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी वेगळया सुविधांचा आवश्यकता असते. वन्य प्राण्यांवर कमीत कमी मानवी संपर्क होवून उपचार करुन लवकरात लवकर अधिवासात सोडणे आवश्यक असते. त्यादृष्टीने रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्सरे यांसारख्या अद्ययावत सुविधांची आवश्यकता असते. प्राण्यांचे सोनोग्राफी सेंटर, ऑपरेशन थिएटर, औषधे या सर्व सुविधा ट्राझिंट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहेत. या उपचार केंद्रामध्ये मांस भक्षी, प्राणी-पक्षी, तृणभक्षी, जलचर प्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.