(खालापूर)
रायगडमधील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना 19 जुलैच्या रात्री घडली. इर्शाळवाडी येथील बचावकार्य अजून सुरु आहे. दोन दिवसातील बचावकार्यात ढिगाऱ्याखालून अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून अख्खी वस्ती त्याखाली दबून गेली. काल दुसर्या दिवशीही मुसळधार पाऊस आणि वार्यामुळे बचावकार्यात सतत अडथळा येत होता. मात्र, वनखात्याने थोडी संवेदनशीलता दाखवली असती, तर अनेक जणांचे जीव वाचले असते, असा आरोप काही आदिवासी करत आहेत.
या अपघातातून बचावलेल्या काही गावकर्यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यावर इथे अनेक अडचणी येतात. पाऊलवाटेनेच इथे पोहोचता येते. पावसामुळे वाट निसरडी झाल्याने शाळेत जाताना जाता-येता मुलांना भीती वाटते. म्हणून आम्ही खाली ट्रेकिंग पॉईंटजवळ बेस कॅम्प येथे तीस-चाळीस झोपड्या बांधल्या. पाऊस संपेपर्यंत आम्ही तिथे राहणार होतो. पण वनविभागाने आमच्या झोपड्या तोडल्या आणि आम्हाला तिथे राहण्यास मनाई केली. आम्ही खाली राहिलो असतो तर इतक्या लोकांना प्राण गमवावे लागले नसते. या आरोपांची चौकशी होणे गरजेचे आहे.
आतापर्यंत दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 119 जणांना बाहेर काढण्यात आले होते. दुर्घटनेच्या दुसर्या दिवशी ढिगार्याखाली नेमकी कुठे घरे होती, कोणत्या घरात किती माणसे होती याची माहिती गावकर्यांकडून घेऊन त्यानुसार बचावकार्याची आखणी केली होती. पण पावसामुळे कालही या कामात अडचणी येत होत्या. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या कार्यकर्त्यांनी ढिगारा उचलण्यासाठी पायथ्यापाशी डम्पर आणला, पण तो वर नेता आला नाही. बचावकार्यासाठी आलेले पायीच वरच्या बाजूला गेले. त्यांनी अपघातात जखमी झालेल्या शेळ्या, गायींवर उपचार केले. बेस कॅम्पमध्ये थांबलेले काही गावकरी काल उशिरा वस्तीवर गेले. ज्यांची घरे वाचली होती ते सामान आणायला गेले, तेव्हा घरातील कपाटे उघडून त्यांचे सामान चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्याचा आणखी एक धक्का त्यांना सहन करावा लागला.
या बचावकार्यात ‘यशवंती हायकर्स’ या गिर्यारोहक संस्थेचे 25 स्वयंसेवक, चौकचे 30 ग्रामस्थ, वरोसेचे 20 ग्रामस्थ, खोपोली नगरपालिकेचे 25 कर्मचारी, चौक ग्रामपंचायतीचे 15 कर्मचारी, पनवेलच्या निसर्ग ग्रुपचे 15 स्वयंसेवक तसेच कोलाडचे रिव्हर राफटर्स इत्यादींचा सहभाग होता. एनडीआरएफच्या 4 टीमचे एकूण 100 जवान, टीडीआरएफचे 80 जवान यांनीही कामगिरी बजावली. इर्शाळगडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करण्यात आली आहेत. शोध व बचावकार्यासाठी आवश्यक साहित्य तातडीने बेस कॅम्प येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह नातेवाईकांकडे न देता मृतदेहांवर डोंगरावरच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या अपघातात जखमी आणि मृत झालेल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मृतांची नावे –
1) रमेश हरी भवर (26)
2) जयश्री रमेश भवर (2)
3) रूद्रा रमेश भवर, (1)
4) विनोद भगवान भवर (4)
5) जिजा भगवान भवर (36)
6) अंबी बाळू पारधी (45)
7) बाळू नामा पारधी (52)
8) सुमित भास्कर पारधी, (3)
9) सुदाम तुकाराम पारधी (18)
10) दामा भवर (40)
11) चंद्रकांत किसन वाघ (18)
12 ) राधी रामा भवर (37)
13) बाळी नामा भुतांब्रा (70)
14) भास्कर बाळू पारधी (26)
15) पिका उर्फ जयश्री भास्कर पारधी (20)
16) अन्वी भास्कर पारधी (6)
17) दामा सांगू भवर (40 वर्ष)
18) कमळ मधू भुतांना (43 वर्ष)
19) कान्ही रवी वाघ (45 वर्ष)
20) हासी पांडुरंग पारथी (50 वर्ष)
21) पांडुरंग धाऊ पारधी (60 वर्ष)
22) मधुनामा भूतांब्रा (45 वर्ष)
23) रविंद्र पद् बाघ (46 वर्ष)
1) प्रविण पांडुरंग पारधी (21)
2) यशवंत राघो डोरे (37)
3) रामी रामु पारधी (77)
4) कमली महादु पारधी (50)
5) भगवान हरी भवर (25)
6) मनिषा यशवंत डोरे (35)
7) हरी सांगू भवर (40)