( खेड / प्रतिनिधी )
खेड तालुक्यातील सातवीनगांव येथे लागलेला वणवा आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या वनरक्षकाना 20 ते 25 जणांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी 11.45 मी सुमारास घडली. या मारहाणीत 2 वनरक्षक जखमी झाले आहेत. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी श्री. निलेश फावरे (रा. दाभिळ, बैकरवाडी), श्री. अरविंद फावरे (रा. दाभिळ, बैकरवाडी), श्री. धोंडु बैकर (रा. दाभिळ, बैकरवाडी) व इतर २० यांचेविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सातवीनगांव येथे वणवा लागल्याचे समजताच खेड काडवली येथील वनरक्षक, तळे, खवटी व मौजे मोरवंडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी येथील ग्रामस्थ यांचेसमवेत सातवीनगांव वणवा वनक्षेत्रामध्ये जावू नये यासाठी तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी सायंकाळी ४.४५ वाजता मौजे दाभिळ, करवाडी खेड येथील २० ते २५ जणांनी शासकीय वनांमध्ये प्रवेश करून, हा वणवा वन कर्मचारी यांनीच लावला आहे अशी समज करून घेतली. यावेळी जमाव आक्रमक झाला. वन कर्मचारी यांचेशी ते वादविवाद करू लागले. यावेळी वन कर्मचारी जमावाला सांगत होते “आम्ही वनकर्मचारी आहोत, वणवा हा बोरज या गांवाच्या दिशेने आला आहे. तो आम्ही वनक्षेत्रमध्ये जावू नये, म्हणून आटोक्यात आणत आहोत” असे वारंवार सांगत होते.
मात्र तरीही या जमावामधील निलेश फावरे (रा. दाभिळ, करवाडी) त्यांचे सोबत असलेले इतर २० लोकांनी श्री. परमेश्वर नवनाथ डोईफोडे, वनरक्षक तळे यांचे डोक्यात लाकडी काठीने मारून त्यांना जखमी केले. तसेच वनरक्षक काडवली श्री. अशोक अजिनाथ ढाकणे यांनाही मारहाण केली. त्यानंतर त्यांनी वनक्षेत्राच्या हद्दीखुणामध्ये बदल केला आहे.
सदर हल्ल्यामध्ये श्री. परमेश्वर नवनाथ डोईफोडे, वनरक्षक तळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असल्याने, त्यांना औषधोउपचाराकरीता कळंबणी ता. खेड येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये तात्काळ दाखल करणेत आले. संशयित आरोपी श्री. निलेश फावरे (रा. दाभिळ, बैकरवाडी), श्री. अरविंद फावरे (रा. दाभिळ, बैकरवाडी), श्री. धोंडु बैकर (रा. दाभिळ, बैकरवाडी) व इतर २० यांचेविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. तसेच सदर प्रकरणी वरील संशयित आरोपी यांचे विरूध्द पोलीस ठाणे खेड येथे दिनांक २९.०१.२०२३ अन्वये भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे.
सदर गुन्ह्यांच्या अनुषगांने दिनांक २९.०१.२०२३ रोजी विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), सहा. वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण), परिक्षेत्र वन अधिकारी दापोली व चिपळूण वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी, तसेच खेड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक खेड व त्यांचेकडील अधिनस्त पोलीस कर्मचारी यांनी मौजे दाभिळ, बैकरवाडी ता. खेड येथे जावून अधिकचा तपास केला असता. १) निलेश फावरे २) अरविंद फावरे ३) धोंडु बैकर यांना ताब्यात घेवून पुढील तपास चालू आहे.
सदर गुन्ह्यांचा तपास श्री दिपक खाडे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), श्री सचिन निलख सहा. वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखालील श्री. वै. सा. बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली हे अधिक तपास करीत आहेत. तसेच पोलीस विभागाकडून उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, पोलीस निरीक्षक खेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. हर्षल हिंगे, पोलीस उपनिरीक्षक खेड अधिक तपास करीत आहेत.