काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीनी विधवांना मंगलकार्यात सहभागी करून घेण्याविषयी व विधवांनी मंगळसूत्र परिधान करण्याचा ठराव पास केला होता. त्यानंतर याचे अनुकरण राज्यातही केले गेले. आताही कोल्हापुरातून पुरोगामीत्वाची साक्ष देणारी घटना समोर आली आहे. आपल्या विधवा आईचा पुनर्विवाह घडवून आणण्याच्या मुलाने घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाचे व या अभिनव लग्नाच्या नव्या चालीरीतीचे गाव परिसरात स्वागत केले जात आहे.
वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईचा पुनर्विवाह लावत क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या या तरुणाचे नाव युवराज शेले (वय २३) असे आहे. कोल्हापुरात राहणाऱ्या युवराज शेले या तरुणाच्या आईवडिलांचे म्हणजे नारायण शेले आणि रत्ना शेले यांचे २५ वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोन वर्षानंतर युवराज जन्माला आला. नारायण सेंट्रिगचे काम करायचे तर रत्ना या घरकाम करून त्यांना मदत करायच्या.
दोन वर्षापूर्वी कामावर असताना नारायण यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर युवराजच्या आई रत्ना यांचे आयुष्यच बदलले. तिला नैराश्य आल्याने दिवस रात्र ती पतीच्या विचारात दुःखी असायची. पती निधनानंतर रत्नाला समाजात वेगळी वागणूक मिळताना मुलगा पाहत होता. तिचं हे दु:ख व एकटेपणा युवराजला सहन न झाल्याने युवराजने आईचे दुसरं लग्न लावण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. आईसाठी वर संशोधन सुरू केल्यानंतर त्याला नात्यातच एक शेतकरी व्यक्ती आईसाठी योग्य साथीदार वाटला. त्याने पुढची बोलणी सुरू केली व आईचा नकार असतानाही तिची समजूत घालून होकार मिळवला.
मुलाच्या हट्टापुढे आई लग्नासाठी तयार झाल्यावर त्याने ही गोष्ट नातेवाईक व शेजाऱ्यांच्याही कानावर घातली. त्यांचीही पुनर्विवाहासाठी संमती व समर्थन मिळाले. आणि चार दिवसापूर्वी मोजके पै-पाहुणे व शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. युवराजला नवीन वडिल तर आईला जगण्यासाठी आधार मिळाल्याने यावेळी त्यांचे चेहऱ्यावर समाधान दिसत होते.