(मुंबई/प्रतिनिधी)
एका सात वर्षाच्या मुलींच अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार मुंबई घाटकोपर परिसरात घडली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अवघ्या 24 तासात विकृत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या विकृताने तब्बल पाच वेळा महिला आणि लहान मुलींवर छेडछाड, अत्याचार केल्याच्या तक्रारी आहेत. सचिन अनंत शामा (वय 35) असे या आरोपीचे नाव आहे.
अशी घडली घटना
घाटकोपरच्या आनंद नगर विभागात पीडित 7 वर्षीय मुलगी वडापावच्या स्टॉलवर गेली होती. त्यावेळी या मुलीजवळ येवून आरोपीने गोडगोड बोलायला सुरुवात केली आणि तो घाटकोपरच्या वडापावच्या दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी त्या मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने या चिमुरडीवर अत्याचार केले आणि तेथून पळ काढला. त्या मुलीला एकटीला रडताना तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीला पाहिलं आणि पोलिसांना तसेच तिच्या नातेवाईकांना कळवले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नराधमाला 24 तासात ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.