(आरोग्य)
भारतात लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हल्ली अनेकांची तक्रार असते, मी कमी जेवूनही माझे वजन वाढत आहे. वाढते वजन हा बहुतांश लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. हे वाढणारे वजन घटवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. मात्र अशावेळी भूक लागल्यावरच खाणे व आवश्यक तेवढेच खाणे हे पथ्य प्रत्यकाने पाळले पाहिजे. वजन वाढण्याचे नेमके काय कारण आहे? खाण्यापिण्याच्या कोणत्या सवयींमुळे आपले वजन वाढते? याबाबत थोडक्यात माहिती घेऊ…
चुकीचे खान-पान :
जास्त जेवण करणारेच लठ्ठपणाची शिकार होतात असे नाही, तर कमी जेवण करणारे सुद्धा लठ्ठपणाने त्रस्त होऊ शकतात. यात फरक एवढाच असतो की, आपण काय खात आहोत. आजच्या काळात फास्ट फूड, जंक फूड आणि पॅक्ड फूडचे अधिक सेवन केले जात आहे. जे तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा करते. नेहमीच या गोष्टी खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढायलाच खूप मदत होत असते. तसेच वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेहमी काहीही खायला सुरू करणे. काही वेळा असे दिसून येते की, जर कोणी तुम्हाला काही खाण्यासाठी विचारले तर, आपण खाण्यासाठी लगेच होकार देतो, ते पूर्णपणे चुकीचे आहे. वजन वाढण्यामागे हीच सवय सर्वात महत्वाचे भूमिका वठवत असते. आपण जेवणाच्या, खाण्याच्या वेळा, सवयी सुधारल्या पाहिजेत. आपल्या ठरवलेल्या वेळेनंतर मात्र काहीही खाता कामा नये.
हार्मोन :
लेप्टिन : या हार्मोनमुळे आपल्याला पोट भरल्याचे समाधान होते. हे हार्मोन आपल्या मेंदूला पोट भरल्याचे सांगते व आता अजून जेवण्याची गरज नाही, हा सिग्नल आपल्याला मिळतो. या हार्मोनचे कार्य बिघडल्यावर (लेप्टिन रेजिस्टन्स) ही सिग्नल यंत्रणा नीट काम करीत नाही. जास्त भूक लागून अवाजवी खाल्ले जाते व वजनवाढ होते.
झोप पूर्ण न होणे :
निरोगी व्यक्तीला कमीत-कमी जवळपास 7-8 तासांची झोप आवश्यक असते. पण जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम सरळ तुमच्या आरोग्यावर होतो आणि आरोग्यमध्येही सर्वात आधी तुमच्या वजनावर होतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागते आणि तुम्ही जास्त जेवण करता, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जास्त कॅलरी जाते आणि पुन्हा तुमचे वजन हमखास वाढते.
औषधांचा अति वापर :
तब्येतीच्या जुजबी तक्रारीवरही औषधी गोळ्यांचा वापर आजच्या काळात अत्याधिक होऊ लागला आहे. प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम नक्कीच असतो आणि सर्वात अगोदर ते तुमचे वजन वाढवतात. स्टेरॉइड प्रकाराची औषधेदेखील वजन वाढवू शकतात.
मासिक पाळी जात असताना (मेनोपॉज) :
शरीरात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळेदेखील त्या काळात वजन वाढू शकते.
जीवनशैली :
आजच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक कष्टांचा अभाव आहे. सध्या बहुतांश कामे ही बैठ्या पद्धतीचीच आहेत. लठ्ठपणाचे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. पूर्वी घरी रोजची भरपूर कामे करताना, आपोआप व्यायाम होत असे. हल्ली कष्टाची कुठलीही कामे रोज करावी लागत नाहीत. त्यामुळे रोज व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. लहान-मोठ्या सगळ्यांनीच रोज एक तास व्यायाम करावा. बैठी जीवनशैली बदलली, तर वजन आपोआप नियंत्रणात आणता येईल.
अनुवांशिकता :
काही कुटुंबांमध्ये असे दिसून येते, की त्यांच्या कुटुंबामध्ये काही सदस्य लठ्ठ आहेत, आणि ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे वजन वाढण्याचे हे सुद्धा एक मुख्य कारण असू शकते. लठ्ठपणाचा अनुवंशिकतेशी मोठा संबंध आहे. लठ्ठ आई-वडिलांची मुलेही लठ्ठ होण्याची शक्यता बरीच जास्त असते.