( रत्नागिरी / प्रतिनिधी )
वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी उत्तर विभागातर्फे जिल्हयामध्ये भव्य शक्ती-तुरे जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ३० ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत नोंद करावी असे आवाहन रत्नागिरी (उत्तर) जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी केले आहे.
कोकणातील आषाढ महिना सरत आला की पाऊस थोडा विश्रांती घ्यायला लागतो. यातच पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात. ढोलकीवर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. गेली कित्येक वर्षानुवर्षे कोकणात एक बहुजन वर्गातील पारंपारिक अर्थात शक्ती-तुरे मधील जाखडी नृत्यकार मंडळी वेगवेगळे विषयाच्या माध्यमातून सामाजिक भान राखत लोकांचे मनोरंजन करत असतात. यामध्ये नृत्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कोकणाची मान उंचविण्याचे काम जाखडी नृत्यातून शाहीर व त्यांचे सहकारी करित असतात. मात्र प्रबोधनात्मक परिवर्तन अर्थात शक्ती-तुरे स्पर्धा बहुजनाच्या एकात्मताने नवीन उमंगाने उभे करण्याचे धाडस कोकणातील कलाकरांनी आणि शाहिरांनी करावे, असे आवाहन स्पर्धेच्या माध्यमातून रत्नागिरी वंचित बहुजन आघाडी उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या विजेत्यास प्रथम पारितोषिक रोख रक्कम – २५०००/- व ट्रॉफी, व्दितीय पारितोषिक रोख रक्कम १५,०००/- व ट्रॉफी तृतिय पारितोषिक रोख रक्कम – १०,००० /- व ट्रॉफी देण्यात येणार आहे. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड या परिसरातील स्पर्धकांनी स्पर्धेकरिता नाव नोंदणी सतीश जाधव (९३०७०२८७५४), बुध्दघोष गरे (९५५२४२७९५८/ ९३७०८२४९६) यांच्याकडे करावी.