( खेड / भरत निकम )
खेड तालुक्यातील लोटे येथील दोन ठिकाणी तर बोरघर येथे घरात धाड टाकून दारुसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत लोटे येथील धाडीत लाखोंची गोवा बनावटीची दारु हस्तगत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे येथील सनी संजय नलावडे याने बियर, देशी आणि विदेशी गोवा बनावटीची दारु दोन महिलांच्या सहकार्याने विक्रीकरिता ठेवली होती. तिथे पोलिसांनी धाड टाकून १ लाख २९ हजार ३३२ किंमतीचा साठा जप्त केला. त्यानंतर सनी वास्तव्य करत असलेल्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमधून ११ हजार ४७८ किंमतीची बियर, देशी आणि विदेशी गोवा बनावटीची दारु हस्तगत केली. या दोन्ही ठिकाणी दारुसाठा आढळून आल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर खवटी विभागातील बोरघर ब्राह्मणवाडी येथे अविनाश नारायण चव्हाण याच्या घराच्या पडवीत ५ लीटर गावठी हातभट्टीच्या दारुचा कॅन तपासणीत सापडलेला आहे. त्याची किंमत ३२० इतकी असून अविनाशवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारु सापडत असून उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांनी शांततेची भूमिका का घेतली आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.