(खेड / भरत निकम)
लोटे येथील मोक्याच्या जागा खोटी कागदपत्रे तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या न्यायालयात सादर करुन १ महिन्यात कुळ लावल्यानंतर महिन्याने जमिन मालकाला बेदखल करुन थेट ७/१२ वर नाव दाखल केले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय वर्ग १ चे न्यायाधीश डाॅ. सुधीर देशपांडे यांनी फेटाळून लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौ. लोटे येथील कारखानदार किरण माणिकलाल मेहता यांची कारखान्यासह इतर जमिन मिळकती आहेत. यापैकी ५ एकर जमीन मोक्याच्या ठिकाणी होते. तेथे इमारत बांधकाम सुध्दा आहे. बोरज येथील रहिवासी, वाळू व्यावसायिक व निगडे-बोरजचे प्रभारी सरपंच विशाल विवेक घोसाळकर यांनी महसूल यंत्रणेला हाताशी धरुन या जागेच्या कुळकायद्यान्वये अर्ज तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या न्यायालयात दाखल केला. अर्जासोबत तत्कालीन उपसरपंच चंद्रकांत रघुनाथ चाळके यांनी अकृषिक जमिनीवर विशाल हा भातशेती करतो तर शेतीच्या कामासाठी कवल तोडतो, असे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याशिवाय न्यायालयात खोटा जबाबही दिला. कुळकायदा कलम ७० ब नूसार केवळ तीन तारखांमध्ये कुळ म्हणून विशालचे नाव दाखल करण्याचे आदेश तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या न्यायालयाने दिले. तद्नंतर १ महिन्यात जमिन मालक बेपत्ता दाखवून कलम ३२ (म) नूसार किरण मेहता यांचे नाव कमी करत विशालचे नाव सातबारावर दाखल करण्याचे आदेश दिले.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर लोटे येथील वैभव विलास आंब्रे यांनी चंद्रकांत चाळके व विशाल घोसाळकर यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलीसांनी भादंवि कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, १२० ( ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणात अटकेची कारवाई होण्याच्या शक्यतेने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.
जमिनी हडपणारी टोळी कार्यरत
लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखानदार यांना राजकीय वरदहस्त लाभलेल्यांनी धमकावून पळवलेले आहे. अशा लोकांच्या जमिनी परस्पर नावावर करण्याचे एक प्रकरण समोर आले असतानाच आणखीन किती जमीनी हडप केलेल्या आहेत, याच्या चौकशीची मागणी वाढत आहे. भंगार चोरी नंतर जमिनी हडपणारी टोळी येथे कार्यरत असल्याचे या गंभीर प्रकरणावरुन जनतेसमोर येत आहे.