[ मुंबई ]
सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. सोबत असलेले लोक आपले गुलाम राहिले पाहिजेत अशी भावना सध्या देशात दिसत आहे. प्रादेशिक पक्ष किंबहुना प्रादेशिक अस्मिता नष्ट करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मातोश्रीत साहित्यिक आणि अभ्यासू महाराष्ट्रीय सदस्यांसोबत आयोजित बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
सध्या देशात आणीबाणी आहे असे वक्तव्य करून त्यांनी शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणारा असेल असा विश्वासही शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, मी मुळात राजकारणी नाही, मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते, परंतु परिस्थितीनुसार व जिद्दीने मुख्यमंत्री झालो होतो मात्र त्यात देखील चांगले काम करण्याचा प्रयत्न मी केला.